पुणे : पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून लिफ्टमध्ये अडकल्याने अवघ्या ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. निम्बजनगर येथील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. मृत मुलाचे नाव शिवांश शैलेश धूत असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश रात्री इमारतीत खेळत असताना लिफ्टमध्ये गेला होता. त्यावेळी अचानक लिफ्ट बंद पडल्याने तो आत अडकला. बराच वेळ मुलगा बाहेर न आल्याने रहिवाशांनी शोध सुरू केला. त्यानंतर लिफ्टमध्ये तो अडकल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य करून मुलाला बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये कोणताही मोठा तांत्रिक बिघाड आढळून आलेला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नेमकी दुर्घटना कशी घडली, याचा पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.