नागपूर : नागपूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील ईसापूरजवळ विटांनी भरलेला आयशर ट्रक पलटी झाला आहे. या भीषण अपघातात 3 मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खापा येथून मोवाडकडे जात ट्रक जात असताना सावनेर मार्गावरील ईसापूर गावाजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. रात्री विटांचा ट्रक भरून पहाटेच्या सुमारास निघाला असताना हि दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे.
ट्रकच्या केबिनमध्ये 6 मजूर गाढ झोपेत असतानाच दुर्दैवी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याखाली जाऊन पलटला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ट्रकच्या केबिनमध्ये 6 मजूर गाढ झोपेत होते. झोपेतच काळाने झडप घातली आणि यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. संजय कनेरे, लीलाधर वालूलकर आणि अजित भलावी यांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेही मृतक मोवाड येथील रहिवासी असल्याची माहीती आहे. तर अपघातात 3 मजूर गंभीर जखमी झाले असून राजेंद्र राजगुरू, हेमराज कन्हेरे आणि सुभाष धुर्वे अशी उपचार घेत असलेल्यांची नावे आहेत.
जखमींना वाऱ्यावर सोडून चालक -मालक घटनास्थळावरून फरार, गुन्हा दाखल
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे या भीषण अपघातानंतर जखमींना मदत करायचे सोडून चालक आणि मालक घटनास्थळावरून फरार झाले आहे. जखमींना वाऱ्यावर सोडून पळ काढल्याचा आरोप आता केला जात आहे. या प्रकरणी प्रवीण उर्फ गोलू बले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काटोल पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बीएनएस आणि मोटार वाहन कायद्यान्वये गंभीर कलमे लावली असून पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे.