पुणे : पुण्यातील एरंडवणे परिसरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ६ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशी बागडे या ६ वर्षीय मुलीला डोळ्यांच्या तिरळेपणा (स्क्विंट) व संबंधित समस्येच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नियोजित शस्त्रक्रियेसाठी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रियेच्या दरम्यान तिची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करत उपचार प्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला आहे. “मुलगी पूर्णपणे ठीक होती, मग अचानक काय झाले?” असा प्रश्न कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची नोंद अलंकार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, तसेच आवश्यक असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण प्रकरणाचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.