मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत मुंबई शहरासाठी शूटींग, टेबल टेनिस आणि वेटलिफ्टिंग या तीन क्रीडा प्रकारांच्या प्रतिभा विकास केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून संबंधित खेळांसाठी निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंच्या कौशल्याचे परीक्षण करण्यात येणार असून निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षणासह करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे.
निवड चाचण्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
शुटींग व टेबल टेनिस – कामगार कल्याण मंडळ, दादर – २६ मे २०२६
वेटलिफ्टिंग – नॅशनल हेल्थ लीग, आझाद मैदान – २ जून २०२६
या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांखालील खेळाडू पात्र असून जिल्हास्तरीय पदकप्राप्त तसेच विभागीय, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेला असणे आवश्यक आहे.इच्छुक खेळाडूंनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२६ असून अर्जासोबत जन्मदाखला, पासपोर्ट साईज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला किंवा स्थलांतर प्रमाणपत्र, आधार कार्ड, मेडिकल सर्टिफिकेट, क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट आणि पालक संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. निवड चाचणीच्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.निवड चाचणीसंदर्भात अधिक माहितीसाठी श्री.गराटे ९७०२२१२९२५ साहिल उतेकर ९७०२१७१००४ आणि समृद्धी देवळेकर ८७७९७२७५७१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.