नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला अनेकांनी हा प्रकार केवळ विनोद समजला, मात्र काहीच दिवसांत या पेजने प्रचंड लोकप्रियता मिळवत सोशल मीडियावर वेगळाच ट्रेंड निर्माण केला. अवघ्या पाच दिवसांत या इन्स्टाग्राम हँडलने तब्बल १० लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे अनेक राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया उपस्थितीशी त्याची तुलना होऊ लागली आहे.
या चर्चेची ठिणगी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर पडली. काही बेरोजगार तरुण व्यवस्था, माध्यमे आणि कायदेशीर प्रक्रियेत ‘झुरळांप्रमाणे घुसखोरी’ करतात, असे विधान त्यांनी केले होते. नंतर हे वक्तव्य सर्वसामान्य तरुणांसाठी नसून बनावट पदव्या वापरणाऱ्यांबाबत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. तरीही या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा तरुण अभिजीत दीपके याने अमेरिकेतील बोस्टनमधून ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने सोशल मीडिया मोहिम सुरू केली. त्याने वेबसाईट, इन्स्टाग्राम आणि एक्स अकाउंट सुरू करत बेरोजगारी, शिक्षण आणि तरुणांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी डिजिटल चळवळ उभी केली.
३० वर्षीय अभिजीत दीपके सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असून, यापूर्वी त्यांनी एका राजकीय पक्षाच्या सोशल मीडिया टीममध्येही काम केले आहे. नव्या पिढीला धर्म, जात आणि वादांपेक्षा रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाचे वाटते, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.‘कॉकरोच जनता पार्टी’ ही संकल्पना आता केवळ सोशल मीडिया ट्रेंड न राहता तरुणांच्या नाराजीचे प्रतीक बनत असल्याची चर्चा विविध स्तरांत सुरू झाली आहे.
