पुणे : देशातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला असून देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घोटाळ्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवराज मोटेगावकर, शुभम खैरनार आणि प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. देशभरातील जे खाजगी क्लासेस NEET परीक्षेची तयारी करून घेतात, त्या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी. विशेषतः ज्या क्लासेसमधून संशयास्पदरीत्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उच्च गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, त्या क्लासेस चालकांचे आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि संबंधित नेटवर्कची तपासणी करण्यात यावी.
तसेच या क्लासेसमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांचीही कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. शिक्षण क्षेत्राला लागलेला हा भ्रष्टाचाराचा कलंक असून प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केली आहे.