सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

डिजिटल पुणे    21-05-2026 14:56:20

मुंबई : राज्यातील  टियर-२, टियर-३ आणि वंचित भागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उदयोन्मुख दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तेजस नेटवर्क्स आणि महाआयटी यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव परिमल सिंह, महाआयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच सीएसआर सहभागी यांच्या उपस्थितीत हॉटेल प्रेसिडेंट येथे आयोजित ‘टेकमहा इम्पॅक्ट २०२६’ परिषदेत करण्यात आला.

या कराराअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योग-शैक्षणिक सहकार्य, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाधारित क्षमता वृद्धी यांसाठीही दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत.

महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले की, दूरसंचार अभियंत्यांच्या प्रशिक्षण व क्षमता विकासाला गती देण्यासाठी तेजस नेटवर्क्ससोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘डिजिटल महाराष्ट्र’ या आधुनिक आणि सर्वसमावेशक संकल्पनेच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीएसएनएल ४जी/५जी, भारतनेट, नॅशनल नॉलेज नेटवर्क तसेच संरक्षण आणि सार्वजनिक नेटवर्क प्रकल्पांमध्ये तेजस नेटवर्क्सचा मोठा अनुभव असल्याने ही भागीदारी राज्यासाठी लाभदायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

तेजस नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अर्नोब रॉय यांनी सांगितले की, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानात प्राविण्य असलेले मनुष्यबळ आवश्यक आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण अभियंत्यांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची कंपनीची बांधिलकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तेजस नेटवर्क्सचे उपाध्यक्ष (विक्री) सुनील हंडू यांनी महाआयटीच्या विविध आयसीटी उपक्रमांमुळे महाराष्ट्र डिजिटल प्रशासनात अग्रणी राज्य म्हणून उदयास येत असल्याचे सांगितले. या उपक्रमांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि भविष्योन्मुख अभियंता मनुष्यबळ घडविण्यासाठी कंपनी आपले तांत्रिक कौशल्य उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती