सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 जिल्हा

एआयच्या बळावर राज्याची ‘स्वस्थ महाराष्ट्र’कडे वाटचाल; टेक-महाइम्पॅक्ट 2026 परिषदेत आरोग्य, हवामान व ग्रामीण विकासासाठी डिजिटल उपायांवर भर

डिजिटल पुणे    21-05-2026 16:19:56

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘स्वस्थ महाराष्ट्र’ घडविण्याचा निर्धार व्यक्त करत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल उपाययोजनांवर भर देण्याची गरज ‘टेक-महाइम्पॅक्ट’ परिषदेत अधोरेखित करण्यात आली. आरोग्य, हवामान बदल, ग्रामीण विकास आणि नागरिक सहभाग यामध्ये एआय व डेटा-आधारित तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मत ‘स्वस्थ महाराष्ट्र’ या विषयावर झालेल्या समारोप परिसंवादात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक-महाइम्पॅक्ट’ कार्यक्रमाचा समारोप ‘स्वस्थ महाराष्ट्र’ या विषयावरील परिसंवादाने झाला. यावेळी आरोग्य, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली

या परिसंवादात महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, प्रोजेक्ट मुंबईचे हेड ऑफ प्रोजेक्ट्स धर्मराज सोलंकी, इंडिया मिलेट्स को अँड एआय अ‍ॅलीच्या संस्थापिका डॉ. सोनम कापसे, आगा खान हॅबिटॅटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा, माहेर बहुउद्देशीय संस्थेच्या उपाध्यक्षा अल्पिनी देशमुख तसेच जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे हेल्थ अँड न्यूट्रिशन विभागप्रमुख डॉ. आशीष जैन यांनी सहभाग घेतला. इलेट्स टेक्नोमीडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवी गुप्ता यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आरोग्य, हवामान बदल, ग्रामीण विकास आणि नागरिक सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी कसा केला जात आहे, याबाबत मान्यवरांनी यावेळी अनुभव मांडले.

मिरा-भाईंदर आणि चंद्रपूर शहरांमध्ये जीआयएस मॅपिंग आणि हीट स्पॉट विश्लेषणाच्या साहाय्याने हवामान कृती आराखडे तयार करण्यात आल्याची माहिती प्रेरणा लांगा यांनी दिली. उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचा नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमानावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सिटिझन सायन्स’ संकल्पनेद्वारे नागरिकांच्या सहभागातून डेटा संकलन, प्रदूषण मापन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी एआयचा उपयोग वाढत असल्याचे धर्मराज सोलंकी यांनी नमूद केले. नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासनाला अधिक परिणामकारक धोरण तयार करण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण, आदिवासी आणि वंचित घटकांसाठी एआय आधारित शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वसन उपक्रम राबविले जात असल्याची माहिती डॉ. सोनम कापसे यांनी दिली. तंत्रज्ञानासोबत मानवी संवेदनशीलतेलाही समान महत्त्व देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तंत्रज्ञान सर्वांसाठी परवडणारे, सुलभ आणि सहज उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे अल्पिनी देशमुख यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग आणि सामूहिक जबाबदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. आशीष जैन यांनी शासन, स्वयंसेवी संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्या समन्वयातून आरोग्यविषयक योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एआय आणि डेटा-आधारित तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. योग्य डेटा आणि पारदर्शक प्रणालीमुळे योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचू शकतो, असे त्यांनी सांगितले.परिसंवादात ‘मानवी संवेदना आणि तंत्रज्ञान यांचा समतोल राखत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास सर्वसमावेशक आणि नागरिकाभिमुख विकास साधता येईल’, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. या परिसंवादानंतर ‘टेक-महाइम्पॅक्ट’ परिषदेत सहभाग घेणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती