उरण : भारतीय मजदूर संघ संलग्न विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ, पुणे कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) गणेश ताठे यांची सदिच्छा भेट घेऊन विविध प्रलंबित कामगार प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
बैठकीदरम्यान विज उद्योगामध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना अत्यंत प्रतिकूल व जोखमीच्या परिस्थितीत काम करावे लागत असून, त्यांच्या कामाचे स्वरूप, तांत्रिक जबाबदाऱ्या व जीविताचा धोका लक्षात घेता विज उद्योगातील कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र किमान वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.यावर अध्यक्ष गणेश ताठे यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करत संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
तसेच पुणे मेट्रो रेल कामगार संघ यांच्या माध्यमातून पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये कार्यरत कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार वेतन देण्यात यावे, तसेच कामगारांना सर्व कायदेशीर सुविधा तातडीने लागू करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली.कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत वरिष्ठ पातळीवर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
या प्रसंगी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मज़दूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात, संघटन सचिव उमेश आणेराव, पुणे मेट्रो रेल कामगार संघ अध्यक्ष राम सुरवसे, तसेच निखील टेकवडे, सुमीत कांबळे व चंद्रकांत नागरगोजे उपस्थित होते.विविध जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यातील महत्वाचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.यावेळी विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले.