नवी दिल्ली : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’वर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स मिळवत चर्चेत आलेल्या या पक्षाचे एक्स (ट्विटर) अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आले आहे.
कॉकरोच जनता पार्टीने अल्पावधीतच इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या पेजचे फॉलोअर्स काही दिवसांतच 13 मिलियनच्या पुढे गेल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे अनेक मोठ्या राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सच्या तुलनेतही या पेजची चर्चा रंगू लागली होती.
दरम्यान, पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती देत एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आल्याचे सांगितले. इन्स्टाग्राम अकाउंटवरही कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र इन्स्टाग्राम अकाउंट सुरू असल्याने अखेर एक्स अकाउंटवर निर्बंध आणण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अभिजीत दीपके यांनी सांगितले की, “ही पार्टी कोणत्याही नियोजनातून उभी राहिलेली नाही. अचानक सुरू झालेल्या या चळवळीला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमच्याकडे लाखो लोक जोडले गेले असून त्यांच्या भावना आणि अपेक्षा समजून घेणं सध्या आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.”
यावेळी त्यांनी देशातील लोकशाही व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. “सत्तेत कोणताही पक्ष असो, प्रश्न विचारले जाणारच. लोकशाहीत जनतेचा आवाज महत्त्वाचा असतो,” असे म्हणत त्यांनी विविध यंत्रणांवर टीकाही केली.
सध्या कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट बंद होण्यामागचे अधिकृत कारण समोर आलेले नाही. मात्र या कारवाईनंतर सोशल मीडियावर या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.