सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 DIGITAL PUNE NEWS

महाराष्ट्रात घुमला ‘श्री स्वामी समर्थ’चा जयघोष; ‘देऊळ बंद 2’ची दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई

डिजिटल पुणे    22-05-2026 12:13:54

मुंबई : तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार एंट्री करत प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. श्रद्धा, अध्यात्म आणि भावनिक कथानकाचा प्रभावी संगम असलेल्या या सिनेमाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीत नव्या विक्रमांची चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी सहा वाजता चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. गुरुपुष्यामृत योग साधत करण्यात आलेल्या या अनोख्या रिलीज प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटेच्या शोसाठीही थिएटरबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, जळगाव, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये ‘देऊळ बंद 2’चे शो पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाले. मुंबईतील भांडुप, ठाणे, कल्याण, अंधेरी, नालासोपारा आणि लोअर परळ परिसरात तिकीटांसाठी प्रचंड गर्दी झाली होती. ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्मवरही तिकिटांची मोठी मागणी पाहायला मिळाली.

पहिल्या दिवसाच्या कमाईबाबत बोलायचं झाल्यास, सॅकनिल्कच्या अहवालानुसार चित्रपटाने 1,175 शोजमधून तब्बल 2.45 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. तर भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 2.89 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. मराठी चित्रपटासाठी ही ओपनिंग अत्यंत दमदार मानली जात आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावरही ‘देऊळ बंद 2’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रेक्षकांनी चित्रपटातील भावनिक प्रसंग, संवाद, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. विशेषतः ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी साकारलेली स्वामी समर्थांची भूमिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं असून त्यांच्या प्रभावी मांडणीची सर्वत्र चर्चा होत आहे. वास्तववादी शैली, दमदार कथानक आणि अध्यात्मिक वातावरणामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे.

वटवृक्ष इंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. उत्कृष्ट छायांकन, भव्य सादरीकरण आणि प्रभावी पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाला अधिक भव्यता प्राप्त झाली आहे.

पहिल्याच दिवशी राज्यभरातील 500 हून अधिक सिनेमागृहांमध्ये चित्रपटाचे 2 हजारांपेक्षा अधिक शो प्रदर्शित करण्यात आले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये तब्बल 25 शो हाऊसफुल्ल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद 2’ हा यंदाच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि संभाव्य ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटांपैकी एक ठरणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.


 Give Feedback



 जाहिराती