कोल्हापूर : समस्त मराठी चित्रपटसृष्टीची मातृसंस्था मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत आज अखेर च्या दिवसा पर्यत १७ जागा साठी ६० अर्ज दाखल झाले आहेत . तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे मराठी चित्रपट विश्वात नवचैतन्य निर्माण झाले असून विविध स्तरांवर हालचालींना वेग आला आहे. सोमवार 25 मे रोजी देवल क्लब सभागृहात छाननी प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर २८ मे पर्यंत माघार घेण्याची मुदत राहणार आहे.विद्यमान सत्ताधारी विरुद्ध बचाव अशी दोन पॅनेल मध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे . २९ मे रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
महामंडळाच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून ७ जून रोजी मतदान तर ८ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत एकूण ३४०३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोल्हापूर मुख्यालयासह पुणे आणि मुंबई येथे मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या प्रतिनिधी रागिनी खडके या निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी सर्व उमेदवार आणि सभासदांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय व खुलेपणाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
“ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने तसेच शासकीय नियमावलीनुसार पार पडेल,” असेही निवडणूक अधिकारी रागिनी खडके यांनी स्पष्ट केले.दीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून आगामी काळात महामंडळाच्या नेतृत्वासाठी चुरशीची लढत होणार आहे . चित्रतपस्वी भालजी पेंढारकर ना . सी . फडके. व्ही .शांताराम आधी दिग्गज आणि अध्यक्षपद भूषवलेल्या या अखिल भारतीय चित्रपट मंडळ महामंडळाच्या नूतन अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे आता समस्त चित्रपट सृष्टीचे लक्ष लागून राहिले .