सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नीट पेपरफुटीप्रकरणी पुणे केंद्रबिदू; पेपर फोडणारे तिघंही पुण्याचेच, तीन विषय अन् तीन शिक्षक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधले, एनटीएही संशयाच्या भोवऱ्यात
  • मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील तीन तासांत पाऊस पडणार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ व्हायरल, समर्थकांना धोक्याचा इशारा, म्हणाले, 'सरकार आपल्या चुकीचीच वाट बघतंय'
  • मोठी बातमी, अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
 जिल्हा

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांची भरती व नवीन योजना गतीने राबवा – मंत्री पंकजा मुंडे

डिजिटल पुणे    23-05-2026 14:12:23

मुंबई : पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरून प्रशासकीय कामाला गती देण्याचे व ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा आधुनिक करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या पशुसंवर्धन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी व पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पशुसंवर्धन विभागाची सविस्तर आढावा बैठक मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी पशुसंवर्धन सचिव रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पशुसंवर्धनाला ‘कृषी दर्जा‘ मिळाल्यानंतरच्या पुढील कार्यवाहीसह, नवीन योजनांची अंमलबजावणी व विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना गतिमान कामाचे निर्देश देण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन क्षेत्राला नुकताच ‘कृषी क्षेत्राचा दर्जा’ बहाल करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर पशुपालकांना व शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राप्रमाणेच विविध सवलती, कर्ज आणि योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे. या निर्णयाची तळागाळातील पशुपालकांपर्यंत प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, तसेच तांत्रिक व प्रशासकीय अडचणी कशा दूर करता येतील, याचा सखोल आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. यामुळे ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बळकटीकरण, फिरते पशुवैद्यकीय दवाखाने व जनावरांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करणे यावर भर देण्यात यावे. शासनाच्या नवीन योजनांची अंमलबजावणी थेट लाभार्थ्यांपर्यंत विनाविलंब पोहोचवण्यासाठी यंत्रणेने अधिक तत्परतेने काम करावे, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

रिक्त पदांची तातडीने भरती होणार

पशुसंवर्धन विभागाचा कारभार अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी व पशुपालकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व ग्रामीण स्तरावर पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी द्यायची असेल तर पशुपालन क्षेत्राचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. ‘कृषी दर्जा’ मिळाल्यामुळे या क्षेत्राला नवे बळ मिळाले असून, सर्व योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व वेगवान पद्धतीने करण्याचे निर्देश मंत्री पंकजा  मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

पशुपालकांचे उत्पन्न वाढवून ग्रामीण भागातील आर्थिक चित्र बदलण्यावर भर.

नवीन शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे.

पशुवैद्यकीय दवाखाने व उपचारांच्या सुविधा आधुनिक करणे.

रिक्त पदांची भरती करून विभागाच्या कामकाजाला गती देणे.

“पशुसंवर्धनाला ‘कृषी क्षेत्राचा दर्जा’ मिळाल्यामुळे आता आमचे पशुपालक व शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होतील. केवळ योजना कागदावर न राहता, त्या शेवटच्या घटकांपर्यंत गतीने पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विभागातील रिक्त पदे तातडीने भरून प्रशासकीय कामाला गती देण्याचे व ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक आधुनिक करण्याचे निर्देश मी दिले आहेत. हा विभाग केवळ एक शासकीय विभाग न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक घराचा आर्थिक आधारस्तंभ बनेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.


 Give Feedback



 जाहिराती