मुंबई : राज्यातील शहरी, झोपडपट्टी तसेच सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना प्रभावीपणे राबविली जात असून आतापर्यंत राज्यात ६७४ दवाखाने कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित २६ दवाखानेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्य शासनाने ११ जुलै २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरात ७०० “आपला दवाखाना” सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यामागचा उद्देश शहरी भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत ४७५ दवाखाने शासन संस्थांमार्फत तर २२५ दवाखाने बाह्य संस्थांमार्फत चालविण्यात येत आहेत.
सध्या ४४९ दवाखाने ‘इन-हाऊस’ पद्धतीने तर २२५ दवाखाने बाह्य संस्थांमार्फत कार्यान्वित असून एकूण ६७४ दवाखान्यांमधून नागरिकांना सेवा दिली जात आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील २१ आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील ५ दवाखाने लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांमधून नागरिकांना मोफत बाह्यरुग्ण तपासणी, १०५ प्रकारची मोफत औषधे, ३० प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या, गरोदर मातांची तपासणी, मानसिक आरोग्य समुपदेशन, आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा तसेच मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, ‘आपला दवाखाना’ ही योजना केवळ उपचारापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य सुरक्षेचा महत्त्वाचा आधार बनत आहे. राज्यातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत मोफत आणि सुलभ आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक दवाखान्यासाठी वार्षिक आर्थिक तरतूद करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी अशी मनुष्यबळ व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. एप्रिल २०२६ अखेरपर्यंत ३५०० मंजूर पदांपैकी २९५७ पदे भरली गेली असून उर्वरित पदभरती प्रक्रिया सुरू आहे.
बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा (शहरी) आयुक्त सुनील भोकरे, अतिरिक्त आयुक्त (एनयुएचएम) जगन्नाथ वीरकर, सहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाइत उपस्थित होते.