आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र आळंदी नगरीत दानपेटीतील पैशांच्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंदिर प्रशासनाने विश्वासाने जबाबदारी दिलेल्याच सेवेकऱ्याने दानपेटीतील रोकड अपहार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रण आणि देखरेखीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दानपेटीतील रक्कम चोरून स्वतःच्या पिशवीत टाकल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, 12, 13 आणि 16 मे 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. मंदिरातील दानपेट्यांमधील रक्कम गोळा करून ती कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी सेवेकरी विशाल बाळू वारूळे (वय 33) याच्याकडे होती. मात्र, पैसे बकेटमध्ये भरताना सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवत त्याने काही रक्कम स्वतःच्या पिशवीत टाकल्याचा आरोप आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मंदिर परिसरातील हार ठेवण्याच्या जागेजवळ जाऊन ती रक्कम लपवत असे आणि नंतर सर्व पैसे कॅशियरकडे जमा केल्याचा आव आणत होता. तीन दिवसांत सुमारे 15 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
संस्थानच्या कारभारावर पुन्हा टीका
ही घटना समोर आल्यानंतर संस्थान कमिटीच्या कारभारावर नागरिकांकडून जोरदार टीका होत आहे. यापूर्वीही मंदिर परिसरात देणगीतील पैशांच्या चोरीच्या घटना घडल्याची चर्चा होती. मात्र, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप पुन्हा पुढे आले आहेत.
भाविकांच्या मते, दानपेट्यांची मोजणी, सीसीटीव्ही देखरेख, आर्थिक लेखापरीक्षण आणि कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण यामध्ये गंभीर त्रुटी असल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. मंदिर प्रशासनाने पारदर्शकता वाढवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“संस्थान नेमकं कोणाला वाचवतंय?” भाविकांचा सवाल
समाधी परिसरातील पैशांच्या गैरव्यवहारांबाबत यापूर्वीही काही पुजाऱ्यांवर आरोप झाले होते. मात्र, त्यांच्यावर ठोस कारवाई झाली नसल्याने भाविकांमध्ये नाराजी वाढली आहे. त्यामुळे संस्थान प्रशासन नेमके कोणाला पाठीशी घालत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.भाविकांच्या श्रद्धेवर चालणाऱ्या संस्थेतच आर्थिक गैरव्यवहार होत असतील, तर ही केवळ चोरी नसून संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया आळंदी परिसरातून व्यक्त होत आहे.