सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात 14 दिवस जमावबंदी; मोर्चे-सभा बंद, महापालिकेचे इंधन बचतीचे कडक आदेश
  • पुन्हा इंधनदरांचा भडका! पेट्रोल-डिझेल महागले; 10 दिवसांत चौथी वाढ, मुंबईत पेट्रोल 111 रुपयांच्या पार
 जिल्हा

आंबेनळी दुर्घटनेत धक्कादायक खुलासा; २४ तास कुणालाच कळलं नाही स्कॉर्पिओ दरीत कोसळल्याचं

डिजिटल पुणे    25-05-2026 17:03:08

रायगड : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताबाबत आता एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. स्कॉर्पिओ कार तब्बल १२०० फूट खोल दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला, मात्र हा अपघात घडल्याचे जवळपास २४ तास कोणाच्याही लक्षात आले नव्हते. कुटुंबीयांनी मुलांचा शोध सुरू केल्यानंतरच संपूर्ण दुर्घटनेचा उलगडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी रात्री आंबेनळी घाटातील दाभिळ टोक परिसरात झाला होता. मात्र रात्रीचा अंधार आणि घाटातील खोल दरी यामुळे गाडी कोसळल्याचे कुणालाच दिसले नाही. रविवारी दिवसभर संबंधित तरुण घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मोबाईलवर संपर्क होत नसल्याने नातेवाईक आणि पोलिसांची धावपळ सुरू झाली. अखेर रविवारी उशिरा रात्री मोबाईल लोकेशनच्या आधारे आंबेनळी घाट परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली आणि स्कॉर्पिओ दरीत कोसळल्याचे स्पष्ट झाले.

या दुर्घटनेतील मृतांपैकी पाच जण सातारा जिल्ह्यातील आसगाव गावातील होते. हे सर्व बालपणापासूनचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. मित्रमंडळी शुक्रवारी रात्री साताऱ्यातून हर्णे येथे फिरण्यासाठी गेली होती. शनिवारी दिवसभर समुद्रकिनारी मौजमजा केल्यानंतर रात्री साताऱ्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र आंबेनळी घाटात त्यांच्यावर काळाने झडप घातली.

मृतांपैकी रितेश लोखंडे यांच्या वडिलांनी सांगितले की, मुलगा रात्री घरी न पोहोचल्याने संशय वाढला. त्यांनी वारंवार फोन केले, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नातेवाईक, मित्र आणि पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मोबाईलचे शेवटचे लोकेशन पोलादपूर-आंबेनळी घाट परिसरात आढळल्याने पोलिसांनी दरीत शोधकार्य सुरू केले.

सुरुवातीला दरीत एक कार दिसली, मात्र ती जुन्या अपघातातील असल्याचे समजले. त्यानंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर खोल दरीत स्कॉर्पिओ आढळून आली. रात्री बचावकार्य करणे धोकादायक असल्याने सोमवारी सकाळी ट्रेकर्सच्या मदतीने दोरी आणि स्ट्रेचरच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या संपूर्ण घटनेनंतर आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एवढा मोठा अपघात होऊनही तब्बल २४ तास प्रशासन आणि यंत्रणांना त्याची माहिती न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती