सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! आजपासून पुण्यात 14 दिवस निर्बंध; मोर्चे, सभा बंद, ‘कार पुलिंग’ सक्तीचं
 जिल्हा

जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    26-05-2026 11:27:26

मुंबई : मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बालभवनच्या संचालक नीता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

बालभवनच्या नूतन वास्तूची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर रितू  तावडे यांनी पुढाकार घ्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रेरणास्थान आहे. नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील. मुलांना बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी येथे मिळते; तसेच त्यांना मातीशी, रंगांशी आणि संगीताशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालभवन गेली ७५ वर्षे सातत्याने काम करत आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, ४ ते १६ वयोगटातील मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या इमारतीत तळमजल्यावर अत्याधुनिक प्रेक्षकगृह आणि सुसज्ज ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर नृत्य दालन, नाट्य कक्ष आणि संगीत कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ; तसेच मूर्तिकला आणि चित्रकला दालने उभारण्यात आली आहेत.

या वास्तूमध्ये १०० विद्यार्थी क्षमतेची तीन सुसज्ज सभागृहे आहेत. एकाच वेळी ५०० विद्यार्थी विविध कलांचे प्रशिक्षण घेऊ शकतील. दररोज ५०० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण क्षमतेनुसार महिन्याला सुमारे १० हजार, तर वर्षभरात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळू शकणार आहे.  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक बालभवन सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे, असे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले.

यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बालभवनच्या संचालक नीता पाटील आणि सर जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक किशोर इंगळे; तसेच कुलसचिव शशिकांत काकडे यांच्यात सामंजस्य कराराच्या प्रतींचे आदानप्रदान करण्यात आले. या करारामुळे  विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती