पुणे : वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला असून आज (26 मे) रात्रीपासून शहरात 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत आंदोलन, मोर्चे, सभा आणि गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध असणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या वाहनांच्या वापरावरही प्रशासनाने कठोर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या विविध विभागांकडून वाहनांचा वाढता वापर, अतिरिक्त इंधन खर्च आणि आर्थिक ताण लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सर्व विभागप्रमुखांना इंधन बचतीसंदर्भात तातडीच्या सूचना दिल्या आहेत. अत्यावश्यक कामांसाठीच अधिकृत वाहनांचा वापर करावा, अनावश्यक फेऱ्या टाळाव्यात आणि प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.
आदेशात नेमक्या कोणत्या सूचना?
कार्यालयीन दौऱ्यांसाठी कमीत कमी वाहनांचा वापर करणे बंधनकारक
मंत्रालय, न्यायालय किंवा इतर कार्यालयीन प्रवासासाठी एसटी, रेल्वे, मेट्रो आणि बसचा वापर करण्याच्या सूचना
अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरे करताना ‘कार पुलिंग’चा अवलंब करणे आवश्यक
आठवड्यातील किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याचे निर्देश
बैठका, प्रशिक्षण आणि चर्चासत्रे शक्यतो ऑनलाइन घेण्यावर भर
एका ठिकाणी जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वाहनाऐवजी एकाच वाहनातून प्रवास करावा
इंधन बचतीसाठी प्रशासनाचा फोकस
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याने प्रशासनाने खर्च कपातीची मोहीम सुरू केली आहे. वाहनांची देखभाल, चालक आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, या नव्या आदेशामुळे प्रत्यक्षात किती इंधन बचत होणार आणि वाहनांच्या वापरावर कितपत नियंत्रण येणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.