सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! आजपासून पुण्यात 14 दिवस निर्बंध; मोर्चे, सभा बंद, ‘कार पुलिंग’ सक्तीचं
 क्राईम

आंदेकर टोळीवर पुणे पोलिसांचा मोठा प्रहार; कारागृहातून सुरू असलेल्या हालचालींवर आवळणार लगाम

डिजिटल पुणे    26-05-2026 12:46:50

पुणे : कारागृहात असतानाही पुण्यातील गुन्हेगारी कारवायांमध्ये आंदेकर टोळी सक्रिय असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्य कारागृह प्रशासनाला पत्र पाठवत टोळीतील प्रमुख आरोपींवर तुरुंगातच विशेष निर्बंध लावण्याची मागणी केली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर शहरात सुरू असलेल्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर हल्ले घडवून आणण्यात आले. धनकवडी परिसरातील बालाजीनगर आणि खडी मशीन चौक भागात अलीकडेच घडलेल्या घटनांमध्ये आंदेकर टोळीचे नाव समोर आले आहे. अक्षय म्हस्के याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या तपासातही कारागृहातूनच टोळीच्या हालचाली नियंत्रित केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यामध्ये टोळीतील प्रमुख आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात किंवा स्वतंत्र ठिकाणी ठेवणे, नातेवाईकांच्या भेटींवर नियंत्रण आणणे, कारागृहातून फोन संपर्क रोखणे आणि न्यायालयीन सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सध्या आंदेकर टोळीचा प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर हा धुळे जिल्हा कारागृहात असून त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर नंदुरबार कारागृहात बंदिस्त आहे. खंडणी, खून आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये दोघांवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.कारागृहाच्या आतूनच गुन्हेगारीचे जाळे चालवले जात असल्याचा संशय बळावल्याने पुणे पोलीस आता टोळीच्या नेटवर्कवर निर्णायक कारवाईच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती