सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! आजपासून पुण्यात 14 दिवस निर्बंध; मोर्चे, सभा बंद, ‘कार पुलिंग’ सक्तीचं
 शहर

आजारापेक्षा उपचार भयंकर! पुण्यातील जमावबंदीवर सुप्रिया सुळेंचा संताप; “पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहतंय?”

डिजिटल पुणे    26-05-2026 12:51:44

पुणे :पुणे शहरात लागू करण्यात आलेल्या 14 दिवसांच्या जमावबंदीच्या आदेशावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयावर जोरदार टीका करत पोलीस प्रशासनावर सवाल उपस्थित केले आहेत.

पुण्यात काल रात्रीपासून जमावबंदी आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार मोर्चे, आंदोलनं, सभा यांच्यावर निर्बंध घालण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या काही व्यवसायांवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रशासनाच्या भूमिकेवर निशाणा साधला.

सुळे म्हणाल्या की, पुणे आता 24 तास काम करणारे शहर बनले असून हातावर पोट असलेल्या फेरीवाले, छोटे व्यापारी आणि खाऊ गल्लीतील व्यावसायिकांना रात्री 10 वाजता दुकाने बंद करण्यास सांगणे म्हणजे त्यांच्या उपजीविकेवर घाला घालण्यासारखे आहे. “पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहतंय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचाही मुद्दा उपस्थित केला. महिलांच्या सुरक्षेपासून कोयता गँगच्या दहशतीपर्यंत अनेक गंभीर घटना सातत्याने घडत असताना, गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. गोळीबार, लूटमार आणि दहशतीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“जर हा फक्त प्रतिबंधात्मक आदेश असेल, तर नेमका प्रतिबंध कशासाठी आहे? सणांच्या काळातच कायदा-सुव्यवस्थेला धोका कसा निर्माण होतो?” असा सवाल करत “हा आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे,” अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी प्रशासनावर हल्लाबोल केला.

दरम्यान, प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात इंधन बचतीवर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन वापरात काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर पुणे मनपाकडून काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, कार्यालयीन भेटींमध्ये कमी वाहनांचा वापर करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


 Give Feedback



 जाहिराती