सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! आजपासून पुण्यात 14 दिवस निर्बंध; मोर्चे, सभा बंद, ‘कार पुलिंग’ सक्तीचं
 DIGITAL PUNE NEWS

बॉक्स ऑफिसवर ‘देऊळ बंद 2’ची दमदार घोडदौड; अवघ्या 5 दिवसांत 22 कोटींपेक्षा जास्त कमाई

डिजिटल पुणे    26-05-2026 17:06:44

मुंबई : प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘देऊळ बंद 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ग्रामीण वास्तव, शेतकऱ्यांचा संघर्ष आणि व्यवस्थेला थेट प्रश्न विचारणारी कथा यामुळे प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या पाच दिवसांत चित्रपटाने तब्बल 22.67 कोटी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम रचला आहे.

21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2.45 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. विशेषतः सुट्टीच्या दिवसांचा चित्रपटाला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. रविवारी चित्रपटाने सर्वाधिक 5.90 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. पाच दिवसांत भारतातील नेट कलेक्शन 19.24 कोटी रुपयांवर पोहोचले असून एकूण ग्रॉस कलेक्शन 22.67 कोटी रुपये झाले आहे.

‘देऊळ बंद 2’चे पाच दिवसांचे कलेक्शन

पहिला दिवस (गुरुवार) – 2.45 कोटी

दुसरा दिवस (शुक्रवार) – 2.55 कोटी

तिसरा दिवस (शनिवार) – 4.85 कोटी

चौथा दिवस (रविवार) – 5.90 कोटी

पाचवा दिवस (सोमवार) – 3.40 कोटी

चित्रपटात स्नेहल तरडे एका संघर्षशील शेतकरी महिलेच्या भूमिकेत झळकत आहेत. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण भागातील कठोर वास्तव यावर भाष्य करणारी कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. “मी तुमचं अस्तित्व मान्य करेन, पण आधी परीक्षा द्या,” असा सवाल देवाला करणाऱ्या महिलेचा संघर्ष चित्रपटाचा गाभा ठरतो.

या चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, ओम भूतकर, सविता मालपेकर यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर ‘देऊळ बंद 2’लाही प्रेक्षकांनी तितक्याच उत्साहाने स्वीकारल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.


 Give Feedback



 जाहिराती