सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पुण्यात विषारी दारूमुळे 13 जणांचे बळी, देवेंद्र फडणवीसांचे कडक कारवाईचे निर्देश
  • मोठी बातमी : IMD च्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक वाढली, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक
 क्राईम

पुण्यात विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कडक कारवाईचे आदेश, संपूर्ण रॅकेटचा शोध सुरू

डिजिटल पुणे    29-05-2026 12:42:50

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूचे सेवन केल्याने आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून अनेक रुग्णांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यातील काळेपडळ परिसरात तीन आणि हडपसर भागात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकरणामागे स्पिरिट मिसळून तयार केलेली विषारी दारू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

ही दारू योगेश वानखेडे याच्याकडून तयार करून विविध भागात पुरवली गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. संबंधित ठिकाणी ही दारू सेवन केल्यानंतर काही नागरिकांना तोंडाला फेस येणे, अचानक प्रकृती बिघडणे आणि मृत्यू होणे अशी लक्षणे दिसून आली.

या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध सुरू आहे. फुगेवाडीतील दारू गुत्ता परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. “ही अत्यंत गंभीर घटना आहे. यामागील संपूर्ण नेटवर्क शोधून कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मृतांची नावे (पुणे परिसर):

राहुल शरद क्षीरसागर (45, हडपसर)

यशवंत पवार (60, हडपसर)

अरुण डाडर (हडपसर)

अशोक चव्हाण (काळेपडळ)

विजय शर्मा (हडपसर)

या घटनेमुळे पुणे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती