पुणे: “पुणे महापालिकेच्या छत्रपती संभाजी उद्यानात (जंगली महाराज रोडवरील) नुकतेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले, याबद्दल सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आपले मनापासून अभिनंदन करीत आहोत. शंभूराजांचा तेजस्वी पुतळा तितक्याच सुशोभनीय पध्दतीने बसवण्यात आला आहे, याचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद आहे.
काही समाजकंटकांच्या चिथावणीखोर वक्त्यव्यांमुळे तसेच सामाजिक सौहार्दता टिकवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी उद्यानातील श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकण्यात आला आहे. श्रेष्ठ लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आचार्य प्र. के. अत्रे यांनी हा पुतळा संभाजी उद्यानात बसवला होता. त्यामुळे सदरच्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची सुयोग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करावी अशी आमची मागणी आहे.
त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी लाल महालात असलेल्या गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचा पुतळा देखील सामाजिक असंतोषामुळे काढून टाकला होता व सद्यस्थितीत हा पुतळा सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात वाईट अवस्थेत पडून आहे. सदरचा पुतळा देखील पुणे शहरात सुयोग्य ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसवण्यात यावा अशी आमची सर्वांची एकमुखी मागणी आहे.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजी उद्यानातील (जंगली महाराज रोड परिसर) काही महिन्यांपूर्वी काढण्यात आलेला राम गणेश गडकरी यांचा पुतळा योग्य सन्मानासह पुन्हा बसवण्यात यावा. तसेच, सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा देखील पुण्यातील योग्य ठिकाणी सन्मानपूर्वक पुनर्स्थापित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, सामाजिक सौहार्द राखण्यासाठी व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा सन्मान जपण्यासाठी पुणे महापालिकेने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.महापालिकेकडून विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त पुतळ्यांबाबत सन्मानपूर्वक कार्यक्रम केले जातात, त्यामुळे या दोन्ही पुतळ्यांनाही योग्य सन्मान मिळावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.