पुणे : भारतीय जनगणनेचे काम सुरू असताना कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पुणे महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विनाकारण गैरहजर राहणाऱ्या तसेच प्रशासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सिंहगड रोड परिसरात जनगणनेसाठी एकूण १,१७४ ब्लॉक निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी १,१७४ प्रगणक आणि १९२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना नियमानुसार जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक कर्मचारी विनाकारण अनुपस्थित राहिल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त विजयकुमार वाघमोडे यांनी कठोर भूमिका घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. जनगणना अधिनियम १९४८ मधील कलम ११ अंतर्गत गैरहजर प्रगणकांविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
“जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असून त्यात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.