पुणे : प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांत या चित्रपटाने देशभरात 39.15 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
मोहन जोशी, स्नेहल तरडे आणि इतर दिग्गज कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने 3.10 कोटी रुपयांची कमाई केली असून, वीकेंडमध्ये आणखी मोठी झेप घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, पहिल्या आठवड्यातच ‘देऊळ बंद 2’ने 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सध्या देशभरातील 1,875 हून अधिक शोमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असून, मराठी चित्रपटांमध्ये सर्वाधिक प्रेक्षकसंख्या खेचणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे.
मुंबईमध्ये शुक्रवारी 606 शो तर पुण्यात 395 शोमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या काळात चित्रपटाला 26 ते 37.5 टक्क्यांपर्यंत प्रेक्षकांची उपस्थिती मिळाल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे, ‘देऊळ बंद 2’ने कमाईच्या बाबतीत रितेश देशमुखच्या ‘लय भारी’सह ‘पावनखिंड’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘ठाकरे’ आणि ‘टाइमपास’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांना मागे टाकले आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट (नेट कलेक्शन)
राजा शिवाजी – 94.04 कोटी
सैराट – 90 कोटी
बाई पण भारी देवा – 78.28 कोटी
वेड – 62.20 कोटी
नटसम्राट – 42 कोटी
देऊळ बंद 2 – 39.15 कोटी
पावनखिंड – 37.72 कोटी
लय भारी – 37 कोटी
कट्यार काळजात घुसली – 35 कोटी
ठाकरे – 31 कोटी
टाइमपास – 30 कोटी
आता ‘देऊळ बंद 2’ पुढील काही दिवसांत 40 कोटींचा टप्पा ओलांडून आणखी कोणते विक्रम मोडतो, याकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.