सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
 क्राईम

पुण्यातील विषारी दारूकांडाचा बळी वाढला; उरळी कांचनमधील रिक्षाचालकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 22 वर

डिजिटल पुणे    30-05-2026 14:15:01

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर यांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश अवचर यांनी दोन दिवसांपूर्वी गावठी दारूचे सेवन केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली. सुरुवातीला दृष्टी धूसर होणे, मळमळ, रक्तदाबातील अस्थिरता अशी लक्षणे दिसू लागली. पुढे प्रकृती अधिक गंभीर होत गेल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अवचर यांनी ज्या ठिकाणी दारूचे सेवन केले होते, तो परिसर आणि अवैध दारू निर्मितीचे ठिकाण एकाच भागात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विषारी दारूचे जाळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर उरळी कांचनपर्यंत पोहोचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकरणात 22 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

विषारी दारूकांड प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई करत आतापर्यंत 22 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकारी, हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अवैध दारू अड्ड्यांवरून संशय

पुणे-मुंबई महामार्गालगतच्या फुगेवाडी परिसरात एका दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले. स्थानिक नागरिकांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी आणि गावठी दारूच्या अड्ड्यांमुळेच हे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी विषारी दारू तयार करण्यात आलेल्या ठिकाणाचा शोध घेतला असून मुख्य आरोपींसह आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या संपूर्ण रॅकेटमागील साखळी उघड करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या पाहता प्रशासनासमोर अवैध मद्यनिर्मिती आणि विक्री रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.


 Give Feedback



 जाहिराती