मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीने अखेर जागावाटपाचा तिढा सोडवला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चेनंतर 17 जागांसाठी अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.
भाजपने आपल्या 11 उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित झाली आहेत. या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या शक्तिपरीक्षेच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
भाजपचे उमेदवार
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर
अमरावती : प्रवीण पोटे
सोलापूर : राजेंद्र राऊत
सांगली-सातारा : धैर्यशील कदम
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट
नांदेड : अमर राजूरकर
धाराशिव-बीड-लातूर : बसवराज पाटील
जळगाव : नंदकिशोर महाजन
नागपूर : राजीव पोतदार
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
ठाणे : रवींद्र फाटक
नाशिक : नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली : सईद खान
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी / किरण पांडव / सलीम खातून यांच्यापैकी एक नाव निश्चित होण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे
पुणे : विक्रम काकडे
दोन वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या जागांवर निवडणूक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे विधान परिषदेच्या या जागांवरील निवडणूक रखडली होती. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही जागा रिक्त राहिल्या. आता आवश्यक मतदारसंख्या पूर्ण झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना : 25 मे
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 1 जून
अर्ज छाननी : 2 जून
अर्ज माघार : 4 जून
मतदान : 18 जून (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी : 22 जून
राज्यातील सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती यांसह एकूण 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होणार असून महायुतीच्या जागावाटपामुळे निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे.