खालापूर : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अवजड वाहनांचा मोठा चक्काचूर झाला असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. खालापूर येथील फूड मॉलजवळ आज पहाटे सुमारे पाच वाजता हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अवजड वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर मागून येणाऱ्या एका इर्टिगा कारनेही अपघातग्रस्त वाहनाला धडक दिली. या घटनेत कारमधील दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग लिंक मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे लोणावळ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्ग तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळविण्यात आली. परिणामी परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आणि जवळपास दोन तास वाहतूक विस्कळीत राहिली.
अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर प्रशासनाने मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. दरम्यान, मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीवर या घटनेचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले.सतत घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रभावी उपाययोजनांची मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून केली जात आहे.