केरळ : केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (IMD) केली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला असून आता मान्सूनची पुढील वाटचाल महाराष्ट्राकडे होणार आहे. मात्र, राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
सध्या महाराष्ट्रातील विविध भागांत पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा असून त्याचा मान्सूनच्या आगमनाशी थेट संबंध नाही. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागांत किमान 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या न करता दमदार आणि स्थिर पावसाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मान्सूनच्या अधिकृत आगमनानंतरच शेतीची कामे सुरू करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी भारतीय हवामान विभाग काही निश्चित निकषांचा आधार घेतो. त्यामध्ये ठरावीक हवामान केंद्रांवर पुरेसा पाऊस, समुद्रावरील पश्चिमेकडील वाऱ्यांची तीव्रता आणि वातावरणातील विशिष्ट ऊर्जा पातळी यांचा समावेश असतो. हे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच मान्सूनचे अधिकृत आगमन घोषित केले जाते.
दरम्यान, यंदा देशात सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून याचा शेती क्षेत्राला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.