पुणे : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला राज्यासह देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित कथानकामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची मोठी चर्चा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी म्हणजे रविवारी चित्रपटाने 5.75 कोटी रुपयांची कमाई केली. याआधी 10 व्या दिवशी चित्रपटाने 5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे एका दिवसातच कमाईत 75 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 11 व्या दिवशी चित्रपटाचे तब्बल 2,015 शो प्रदर्शित करण्यात आले होते.
आतापर्यंत ‘देऊळ बंद 2’ने देशांतर्गत 44.66 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले असून एकूण बॉक्स ऑफिस कमाई 52.55 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अवघ्या 8 ते 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात खर्चाच्या अनेक पटींनी कमाई केली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा प्रवीण तरडे यांनी साकारली आहे. तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्नेहल तरडे यांच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे.