पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुनर्गठन दिन मेळावा,'विषमता निर्मूलन निर्धार आणि सन्मान सोहळा' गुरुवार,दि.४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 'साने गुरुजी समता पुरस्कार' हा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. 'साने गुरुजी जीवन गौरव सन्मान' हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शक डॉ.शैला नरेंद्र दाभोलकर,समाजवादी नेत्या साजेदा निहाल अहमद,ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,शिक्षण व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिरीष चौधरी तसेच शेतकरी,कामगार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेले अॅड.सुरेश ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजवादी नेते कपिल पाटील,साधना ट्रस्टचे विश्वस्त सचिव हेमंत नाईकनवरे आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त जयवंत पाटील उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे असणार आहेत.राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त अतुल देशमुख,जाकीर अत्तार,ज्येष्ठ विश्वस्त अरविंद सावला तसेच राष्ट्रीय महासचिव सुनील यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या साने गुरुजी बालमंचांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.कार्यक्रमानंतर 'धन्य जोतिबा' हा सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून त्याची संकल्पना व दिग्दर्शन श्रीनाथ म्हात्रे यांचे आहे.राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर आणि राज्य सचिव नवनाथ गेंड हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.या कार्यक्रमास विविध सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्यकर्ते,नागरिक व राष्ट्र सेवा दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली .