मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्येचे होणारे सासरे अरुण लखाणी यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अरुण लखाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी दीर्घकाळ जोडलेले असल्याचे सांगत त्यांच्या उमेदवारीत आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे म्हटले. तसेच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारावेत, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी नेमका कोणता विकास केला हे कोणी पटवून दिल्यास आपणही भाजपमध्ये जाण्याचा विचार करू. देशाच्या विकासात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी तसेच महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान स्पष्टपणे सांगता येते, मात्र मोदी सरकारच्या विकासकामांबाबत भाजपने उत्तर द्यावे, असे त्यांनी म्हटले. माझे मतपरिवर्तन झाले तर मी मोदींचेही कौतुक करेन, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये अविनाश ब्राह्मणकर (भंडारा-गोंदिया), प्रवीण पोटे (अमरावती), राजेंद्र राऊत (सोलापूर), धैर्यशील कदम (सांगली-सातारा), प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), सुहास शिरसाट (छत्रपती संभाजीनगर-जालना), अमर राजूरकर (नांदेड), बसवराज पाटील (धाराशिव-बीड-लातूर), नंदकिशोर महाजन (जळगाव) आणि राजीव पोतदार (नागपूर) यांचा समावेश आहे