सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 जिल्हा

मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    02-06-2026 11:47:23

मुंबई : मातृभाषा आणि भारतीय भाषांमधून ज्ञान, संस्कृती व मूल्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण, भारतीय भाषांचे संवर्धन आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हिंदी पत्रकारितेच्या २०० व्या वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, राजहंस सिंह, मुरजी पटेल, संजय उपाध्याय यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी पत्रकारितेचा इतिहास समृद्ध असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती घडवून आणण्यामध्ये तिचे मोठे योगदान राहिले आहे. ‘उदन्त मार्तण्ड’ या पहिल्या हिंदी वृत्तपत्रापासून सुरू झालेल्या प्रवासाने देशातील सामाजिक आणि राष्ट्रीय विचारप्रवाहाला दिशा दिली. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेत्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले.महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमध्ये शतकानुशतके दृढ संबंध राहिले आहेत. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत परंपरेतून विकसित झालेल्या असून देवनागरी लिपीमुळे त्यांच्यात नैसर्गिक जवळीक आहे. भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सामाजिक माध्यमांच्या विस्तारामुळे माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलले आहे. तथापि, कोणती बातमी किती वेगाने प्रसारित झाली यापेक्षा तिची सत्यता आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजजीवनातील मूल्यांचे जतन आणि लोकशाही संस्थांना बळकटी देण्याचे कार्य पत्रकारिता करत असते. बदलत्या काळातही पत्रकारितेने आपल्या मूलभूत मूल्यांचे जतन करीत समाजहिताची भूमिका कायम ठेवावी.

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी यावेळी हिंदी ही तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते, असे सांगितले.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हिंदी पत्रकारितेसाठी योगदान दिलेल्या वरिष्ठ पत्रकार गंगाधर ढोबळे, हेमंत तिवारी, कुमुद संघवी चावरे, विनीत कुमार सिंग, अवधेश व्यास यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रा. राममोहन पाठक तसेच गायक सुरेश शुक्ला यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.मुंबई हिंदी पत्रकार संघाचे महासचिव विजयसिंह कौशिक यांनी प्रास्ताविकात हिंदी पत्रकारितेची २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली.


 Give Feedback



 जाहिराती