सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड
  • शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, 25 हजारांपर्यंतच पगार असावा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
  • पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
  • हिंजवडीतील ‘थिंकटेक’ फसवणूक प्रकरणात मालक अटकेत; 700 आयटी कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक उघड
 जिल्हा

जपान-भारत सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर – सभापती प्रा. राम शिंदे

डिजिटल पुणे    03-06-2026 16:20:10

मुंबई : भारत-जपान संबंध अधिक मजबूत करण्याची गरज असून भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टासाठी जपानसारख्या देशांशी आर्थिक, तांत्रिक व सामरिक सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.विधानभवनात सभापती प्रा. राम शिंदे यांची जपानच्या वाणिज्यदूत  साटो हितोमी यांनी भेट घेतली. मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासचे उप-वाणिज्यदूत निशिओ र्यो, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी (आयएफएस) स्वप्नील थोरात, विधिमंडळ सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (२) मेघना तळेकर, सचिव (४) शिवदर्शन साठ्ये आणि सभापती यांचे सचिव पंडित खेडकर उपस्थित होते.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी जपानच्या विकासाचा आणि द्वितीय महायुद्धानंतरच्या पुनर्निर्माणाचा उल्लेख करत  जपानच्या प्रगतीचे कौतुक केले. महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद करत त्यांनी राज्यात गुंतवणूक, उद्योग आणि रोजगारवाढीसाठी जपानी सहकार्याचे स्वागत केले. तसेच भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आगामी काळात आणखी बळकट होतील, असा विश्वास  व्यक्त केला.पायाभूत सुविधा, उद्योग आणि विकास प्रकल्पांमध्ये जपानचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. ‘विकसित भारत २०४७’ची माहिती देत विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाभिमुख धोरणांना गती दिली जात आहे.

महाराष्ट्रातील गुंतवणूकक्षम वातावरणाचा तपशील मांडताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी परिसरात जपानी कंपन्यांनी ५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याची त्यांनी माहिती दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सभापती प्रा. शिंदे त्यांनी नमूद केले.मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख करत सभापती शिंदे यांनी भारत-जपान संबंध अधिक बळकट होत असल्याचेही सांगितले.

महाराष्ट्रासह भारताच्या प्रगतीसाठी जपानचा सकारात्मक सहभाग – साटो हितोमी

जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी भारत-जपान संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक आदानप्रदानाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले.भारतात काम करण्याचा दीर्घ अनुभव लाभल्याचा उल्लेख करत त्यांनी मुंबईत कार्य करण्याची संधी मिळणे हा सन्मान असल्याचे नमूद केले.भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य गेल्या काही वर्षांत अधिक बळकट झाले असून, विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण आणि लोकांमधील संवाद यांना चालना देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताच्या विकास प्रवासात जपान नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर राहील. भविष्यात दोन्ही देशांतील मैत्री आणि आर्थिक संबंध आणखी मजबूत होतील, असेही मत  जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी व्यक्त केले.दरम्यान, सभापती प्रा. शिंदे यांनी जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांचे शाल,  पुष्पगुच्छ, गौरवचिन्ह, लोकसेवेचा लोकजागर ग्रंथ देऊन स्वागत केले.


 Give Feedback



 जाहिराती