पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारूकांडानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर फुगेवाडी परिसरातील ज्या ठिकाणाहून विषारी दारूची विक्री होत असल्याचा आरोप आहे, तो बेकायदा दारू अड्डा पुढील 24 तासांत हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या तपासणीत संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. संबंधितांनी स्वतःहून अड्डा हटवला नाही, तर महापालिका थेट तो पाडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, विषारी दारूकांडाच्या तपासात सीआयडीने आणखी मोठी कारवाई करत मिथेनॉल पुरवठा करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. ठाण्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या या आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिथेनॉलची विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे. याच मिथेनॉलचा वापर दारूमध्ये करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या दुर्घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असून बेकायदा दारू विक्री आणि त्यावरील नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.