पुणे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जेष्ठ वद्य सप्तमी, मंगळवार 7 जुलै 2026 रोजी श्रीक्षेत्र देहू येथील देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
यंदाची आषाढी एकादशी 25 जुलै रोजी असल्याने वारकरी, दिंड्या आणि विविध पालखी सोहळ्यांच्या तयारीला वेग आला आहे. पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची सोहळा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी नव्या बैलजोड्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या विविध भागांतून हजारो दिंड्या आणि शेकडो मानाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. संत गजानन महाराज, संत मुक्ताई यांच्यासह अनेक संतांच्या पालख्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात ही वारी पंढरीकडे मार्गक्रमण करणार असून आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाकडेही वारकरी भक्तांचे लक्ष लागले आहे.