पुणे : चंदननगर परिसरात हुंड्यासाठी होणाऱ्या कथित छळामुळे २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेचे नाव तेजस्विनी गोरख सोनवणे असे असून, लग्नानंतर काही काळातच तिला सासरच्या मंडळींकडून आर्थिक मागण्या आणि त्रासाला सामोरे जावे लागत होते, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
तक्रारीनुसार, चारचाकी वाहन खरेदी, फ्लॅटसाठी पैसे तसेच सोन्याची अंगठी आणण्यासाठी तेजस्विनीवर माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकला जात होता. या मागण्यांमुळे तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.
सततच्या छळामुळे ती मानसिक तणावाखाली गेली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.घटनेनंतर तेजस्विनीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात हुंडाबळी व छळाचे गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.