सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, विदर्भाला 15 जूनपर्यंत प्रतीक्षा
 शहर

राष्ट्र सेवा दलाचा पुनर्गठन दिन मेळावा, 'विषमता निर्मूलन निर्धार आणि सन्मान सोहळा' उत्साहात ;देश वाचविण्यासाठी निर्णायक लढ्याची गरज : मेळाव्यातील सूर

डिजिटल पुणे    05-06-2026 11:33:03

पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित पुनर्गठन दिन मेळावा, 'विषमता निर्मूलन निर्धार आणि सन्मान सोहळा' गुरुवारी साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता येथे उत्साहात  झाला. सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.देश वाचविण्यासाठी निर्णायक लढ्याची गरज आहे असा सूर 

मेळाव्यात उमटला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाजवादी नेते कपिल पाटील, साधना ट्रस्टचे विश्वस्त सचिव हेमंत नाईकनवरे आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त जयवंत पाटील, राज्य अध्यक्ष राजा कांदळकर,   नवनाथ गेंड उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त अतुल देशमुख, जाकीर अत्तार, ज्येष्ठ विश्वस्त अरविंद सावला तसेच राष्ट्रीय महासचिव सुनील यादव , नितीन वैद्य, डॉ.हमीद दाभोलकर, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांची सभागृहात उपस्थिती होती.

यावेळी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना 'साने गुरुजी समता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. 'साने गुरुजी जीवन गौरव सन्मान' अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शक डॉ. शैला नरेंद्र दाभोळकर, समाजवादी नेत्या साजेदा निहाल अहमद, ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षण व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिरीष चौधरी तसेच शेतकरी, कामगार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी कार्यरत अॅड. सुरेश ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानार्थींनी आपल्या कार्याचा आढावा घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. डॉ. सागर भालेराव यांनी सूत्र संचालन केले.

यावेळी बोलताना माजी आमदार    कपिल पाटील यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समतेच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. ते म्हणाले,आपला विचार बुलंद करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.  जयवंत पाटील यांनी राष्ट्रसेवा दलाच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा आढावा घेतला. सागर यांनी सूत्रसंचालन केले.अध्यक्षीय समारोपात अजित शिंदे यांनी विषमतामुक्त समाज निर्माण करण्यासाठी युवकांनी सक्रियपणे पुढे येण्याचे आवाहन केले. सामाजिक परिवर्तनासाठी विचार आणि कृती यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साने गुरुजी बालमंचांचाही गौरव करण्यात आला. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमधील त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.कार्यक्रमानंतर श्रीनाथ म्हात्रे यांच्या संकल्पना व दिग्दर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या 'धन्य जोतिबा' या सांगीतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमास विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्यकर्ते, नागरिक आणि राष्ट्र सेवा दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर आणि राज्य सचिव नवनाथ गेंड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळली.

प्रकट मुलाखतीतून उलगडला कामाचा ध्यास!

पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांशी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी संवाद साधला. शैला दाभोळकर म्हणाल्या, डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्यावर शारीरिक हल्ला होईल, असे वाटत होते. परंतू, हत्या होईल असे वाटत नव्हते. त्यांचे कार्य पुढे ठेवायचे, हा एकच विचार आमच्या डोळ्यासमोर होता.सभोवताली पाहिले की वाटते,आताच्या पिढीला चंगळवादाकडे नेले जात आहे. खरे जगणे या पिढीला कळत नाही. अनौपचारिक शिक्षणाचे अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे. परिवर्तनाचे काम वयाच्या बाराव्या वर्षापासून सुरू केले पाहिजे.

साजेदा निहाल अहमद म्हणाल्या, मी राष्ट्र सेवा दल सैनिक आहे. एस एम जोशी यांचे माझ्या साठी पितृवत होते. मालेगाव दंगलीत प्रजा समाजवादी पक्षाने गोरगरीब मजुरांच्या पुनर्वसनाचे काम केले. आज जी विषमता आहे, ती राजकीय कारणांमुळे आहे. पुढील पिढीत राष्ट्र सेवा दल पोचवणे गरजेचे आहे.

शिरीष चौधरी म्हणाले,'साने गुरुजींचा विचार आमच्या कुटुंबावर आहे. आदिवासी, ग्रामीण भागासाठी आम्ही त्या विचारातून आजही काम चालू आहे. आज द्वेषाच्या वातावरणात जवळचे मित्र दुरावले जात आहेत. राष्ट्र सेवा दल ज्या जिद्दीने काम करीत आहेत, त्याला सलाम करावासा वाटतो.

साम्यवाद आणि राष्ट्र सेवा दलामुळे जडण घडण झाली आणि सामाजिक कामाचा पिंड घडत गेला, असे डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले. विचार स्पष्ट असल्याने समाजात वावरताना अडचण येत नाही, असेही ते म्हणाले.

जॉर्ज फर्नांडिस यांच्यासमवेत काम करताना मजुरांना रोटी कपडा मकान आणि आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम आम्ही केले. आज देश लुटण्याचे काम व्यापारी वृत्तीने होताना पाहताना सेवा दलाचे सैनिकांची फौज लढा देईल असा विश्वास वाटतो, असे एड. सुरेश ठाकूर यांनी सांगितले.

 डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणाले,' सामाजिक विषमता, भेदभाव आणि अन्यायमुक्त समाज घडविण्यासाठी सर्व स्तरांवर सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे . धम्म घेऊन पुढे जाण्यात रस घेतला पाहिजे.समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय हीच परिवर्तनाची प्रभावी साधने असल्याचे त्यांनी नमूद केले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय परिवर्तन होणार नाही.आज देश धोक्यात आहे.देश वाचविण्यासाठी निर्णायक लढ्याची गरज आहे. या लढ्यात आंबेडकरवादी आघाडीवर राहतील.

 


 Give Feedback



 जाहिराती