हडपसर, पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ५ जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिना'चे औचित्य साधून 'कार्बन क्रेडिट जाणीव जनजागृती' हा अत्यंत नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. "एक झाड, एक श्वास, एक कृती, एक बदल" या विचाराने प्रेरित होऊन महाविद्यालयामध्ये या पर्यावरणस्नेही प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. किरण रणदिवे यांनी प्रास्ताविक करून केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना 'कार्बन क्रेडिट' ही संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगत, जागतिक तापमानवाढीच्या काळात या उपक्रमाची असलेली गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. घोरपडे यांनी पर्यावरण संवर्धनाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही, तर त्यांचे पर्यावरण क्षेत्रातील योगदान मोजणेही आवश्यक आहे. महाविद्यालयाचे 'ग्रीन ऑडिट' आणि 'कार्बन क्रेडिट'चे महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने पर्यावरण रक्षणात सक्रिय वाटा उचलला पाहिजे."
या उपक्रमांतर्गत वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने परिसरातील विविध वृक्षांची वैज्ञानिक पद्धतीने मोजमापणी करण्यात आली. यामध्ये उभा अशोका, निलगिरी, गुलमोहर, पिंपळ आणि वड या वृक्षांची उंची व जाडी मोजण्यात आली. या मोजमापावरून त्या विशिष्ट वृक्षांचे 'कार्बन क्रेडिट' निश्चित करून, तशी माहिती देणारे 'कार्बन क्रेडिट माहितीपत्रक' संबंधित वृक्षांना लावण्यात आले.
यासोबतच, महाविद्यालयातील कार्बन उत्सर्जनाचा अंदाज घेण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 'कार्बन फुटप्रिंट अवेअरनेस' (Carbon Footprint Awareness) हा सर्व्हे गुगल फॉर्मच्या (Google Form) माध्यमातून सुरू करण्यात आला.
या नाविन्यपूर्ण उपक्रमास उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य गजला सय्यद, आय.क्यू.ए.सी. समन्वयक व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. लतेश निकम, प्रा. डॉ. सुनिता दानाई-तांभळे, हिंदी विभागप्रमुख डॉ. टिळेकर, सी.ई.ओ. डॉ. अजय कवाडे, सहा. प्रा. अर्चना श्रीचिप्पा, सहा. प्रा. जतीन सिंग, डॉ. वंदना सोनवणे, श्री. चांगदेव पोमण, तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा अर्चना श्रीचिप्पा यांनी केले तर आभार उप प्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.