पुणे : शहरापासून दूर असलेल्या तुळापूर परिसरातील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या 'प्रोजेक्ट एक्स' नावाच्या हायप्रोफाईल पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात 78 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पार्टीसाठी वापरण्यात आलेला बंगला सील करण्यात आला आहे. तसेच कोट्यवधी रुपयांची डीजे साऊंड सिस्टिम, विदेशी मद्याचा साठा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या पार्टीबाबत गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्याचे तसेच विदेशी मद्याची बेकायदेशीर विक्री आणि सेवा केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुमारे 10 लाख रुपयांचे विदेशी मद्य आणि 1.04 कोटी रुपयांची डीजे सिस्टीम जप्त केली आहे.
पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संशयित 23 जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक अहवालानंतर या प्रकरणात आणखी गंभीर कलमे लावली जाण्याची शक्यता आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, कायद्याचे उल्लंघन करून आयोजित करण्यात येणाऱ्या अशा पार्ट्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. प्राथमिक तपासात या पार्टीसाठी बेंगळुरू, दिल्ली, इंदूर आणि राजस्थानसह विविध शहरांमधून तरुण-तरुणी आल्याचे समोर आले आहे.
तसेच अनेक जण विमानाने आणि आलिशान वाहनांमधून पार्टीस्थळी पोहोचल्याचे तपासात उघड झाले आहे. पार्टीचे आयोजन, आर्थिक व्यवहार आणि सहभागी व्यक्तींची भूमिका याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.