पुणे : कुस्ती क्षेत्राने महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा आणि वैभव दिले आहे. मल्लांच्या मोठ्या परंपरेत निवृत्ती नारायण मारणे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी अनेक मल्ल घडवले आणि कुस्ती संस्कृती मजबूत केली. पुण्यानेही कुस्तीची ही परंपरा जपली असून, निवृत्ती मारणे यांचे कार्य आणि आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
कुंजीर तालीम मित्रपरिवार आणि मारणे परिवार यांच्या वतीने स्व. गुरुवर्य निवृत्ती नारायण मारणे (वस्ताद) पथ नामकरण सोहळ्याचे आयोजन फर्ग्युसन रस्त्यावरील कुशल वॉल स्ट्रीट शेजारी करण्यात आले होते. फर्ग्यूसन रोड वरून आपटे रोड कडे जोडणारा रस्ता येथे असलेल्या नामफलकाचे उद्घाटन मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर, दीपक मानकर, नाम फलकाची संकल्पना असलेल्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, आयोजक डॉ. रामदास निवृत्ती मारणे आणि शाम निवृत्ती मारणे, कुंजीर तालीम मित्र परिवार यांच्यासह स्थानिक नगरसेवक, राजकीय व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, निवृत्ती मारणे यांच्यासह ज्यांनी उल्लेखनीय काम करून समाजात योगदान दिले आहे, त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जात आहे आणि भविष्यातही असे प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले. कुस्तीचे स्वरूप बदलले असून, आता मातीऐवजी मॅटवर आधुनिक कुस्ती शिकवली जाते. लाल मातीचे वैभव कमी झाले असे वाटत असले तरी पुण्यातील कुस्ती परंपरा आणि लाल मातीचे महत्त्व कायम राहील.मा. नगरसेवक दीपक मानकर भाषणात म्हणाले की, वस्ताद निवृत्ती दादा हे कमालीचे शिस्तप्रिय होते परंतु अतिशय आनंदी वातावरणात व्यायाम आणि कुस्तीचा सराव करून घ्यायचे, कोणत्या ऋतुमध्ये काय आहार घ्यावा याचे मार्गदर्शन करायचे. त्यांच्या शिस्तबद्ध परंतु प्रेमळ वागणुकी मुळे अनेक नामवंत पैलवान घडू शकले.
उल्हास पवार म्हणाले, तालमींचे महत्त्व काळाच्या ओघात कमी होत गेले असून, त्यांची जागा आता जिम आणि आधुनिक व्यायामशाळांनी घेतली आहे. मात्र, क्रीडा संस्कृती जपण्याचे काम काही प्रमाणात राजकारणाच्या माध्यमातून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्व. गुरुवर्य निवृत्ती नारायण मारणे (वस्ताद) हे मुळशी तालुक्यातील उरवडे- आंबेगाव या छोट्या खेड्यातून व्यायामाच्या ओढीने आणि कुस्तीच्या आवडीमुळे पुण्यात आले. त्यांचे चुलते बापूसाहेब मारणे यांनी त्यांना “वाघाच्या बछड्याने वाघासारखे असावे” असे सांगितले, हा शब्द त्यांच्या मनावर खोल ठसला आणि त्यांनी त्या जिद्दीने व्यायामास सुरुवात केली. बघता बघता त्यांनी अनेक मैदान गाजवली. गावाकडील उरूस, जत्रा येथील कुस्तीच्या फडांमध्ये त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या आणि त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. चांगले पैलवान देखील त्यांना लढत देण्यासाठी पुढे येत नसत. सन १९६१–१९६२ मध्ये नागपूर येथे ते सलग महाराष्ट्र चॅम्पियन राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कुमठेकर रस्त्यावरील कुंजीर तालमीत अनेक मल्ल उदयास आले. त्यांचे नाव छत्रपती शिवाजी नगर येथील एका मार्गाला देण्यात येत असून, ही बाब पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातील सर्व पैलवान आणि कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाची आहे.
समारंभात पाच तालमीना लाल मातीच्या खुराकासाठी मारणे परिवाराकडून, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे,उल्हास पवार, दीपक मानकर, यांच्या हस्ते रुपये २१ हजार चा खुराक देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पै. श्रीकृष्ण बराटे यांनी केले. आभार प्रदर्शन पै. संदीप वांजळे यांनी केले