पुणे : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' येत्या १४ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या पाच महिन्यांत आणि १५२ भागांमध्ये मालिका गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रेक्षकांसह कलाकारांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. वाहिनीकडून टीआरपीचे कारण देण्यात आले असले, तरी मालिकेच्या अचानक समाप्तीमुळे सामाजिक आणि वैचारिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मालिका पुन्हा सुरू करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी, "१४ जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात ती पुन्हा सुरू करणार," अशी घोषणा केली.
यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचा उल्लेख करत फुले दांपत्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात त्यांच्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिका बंद होणे हे चिंतन करण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हे म्हणाले, "ही मालिका केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी महत्त्वाची आहे. कोणत्या माध्यमातून, कोणत्या प्लॅटफॉर्मवर किंवा कोणत्या स्वरूपात ती पुढे नेणार, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, ही मालिका पुन्हा सुरू करण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
यावेळी त्यांनी २०१७ मध्ये साकारलेल्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेचा संदर्भ देत खंतही व्यक्त केली. "त्या भूमिकेला विरोध करणारे अनेक हात पुढे आले; मात्र ज्योतिराव फुलेंची भूमिका साकारताना प्रोत्साहन देण्यासाठी तेवढ्याच ताकदीने कोणी पुढे आले नाही," असे ते म्हणाले.
तसेच, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची परंपरा पुढे नेण्याचे काम महाराष्ट्राने केले असून, ती वैचारिक बैठक अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनी आगामी काळात नव्या मालिकांचा शुभारंभ करणार असल्याने 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' ही मालिका १४ जून रोजी ऑफ एअर होणार आहे. मालिकेतील अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले होते. त्यामुळे मालिका पुन्हा सुरू करण्याच्या कोल्हे यांच्या घोषणेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.