पुणे : शहरात गंभीर गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ ने अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून ९ गावठी पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ११ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मंगळवारी (१० जून) मांजरी परिसरातील रेल्वे पुलाजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या काही व्यक्तींवर सापळा रचण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकत तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेकायदा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अर्जुनसिंग दुचानी, राजसिंग पांडित आणि सिकंदरसिंग जुसरी अशी असून, ते पुणे व परिसरातील विविध भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर गंभीर गुन्ह्यांमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिस तपासात या आरोपींविरोधात यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच, या शस्त्रसाठ्याचा पुरवठा नेमका कुठून करण्यात आला आणि त्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
ही कारवाई पुणे पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट ६ मधील अधिकाऱ्यांनी केली. या धडक कारवाईमुळे शहरात बेकायदा शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.