ठाणे : ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ एका वृद्धावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी वृद्धाशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी, "काहीही मदतीची गरज भासल्यास नक्की कळवा," असे सांगत त्यांनी मदतीचे आश्वासन दिले.
काही दिवसांपूर्वी ज्युपिटर रुग्णालय परिसरात एक वयोवृद्ध दाम्पत्य पायी जात असताना एका कॅब चालकाने रस्त्यावर थुंकल्याचा प्रकार घडला. यावेळी संबंधित वृद्धाने चालकाला "रस्त्यावर थुंकू नको," असा साधा सल्ला दिला. मात्र, या गोष्टीचा राग मनात धरून चालकाने वृद्धावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.
दरम्यान, मनसेचे ठाणे-पलघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वृद्धांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून दिला. यावेळी राज ठाकरे यांनी वृद्ध दाम्पत्याची आपुलकीने विचारपूस करत प्रकृतीबाबत माहिती घेतली.
घटना नेमकी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्युपिटर रुग्णालयाबाहेर घडलेल्या या प्रकारात कॅब चालक निशांत धर शुक्ला याने वयोवृद्ध व्यक्तीवर दगडाने हल्ला केला. या घटनेत वृद्ध रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी संबंधित चालकाला शोधून काढत पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपीला पोलीस कोठडी
वर्तकनगर पोलिसांनी आरोपी निशांत शुक्ला याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी वृद्ध दाम्पत्याने सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास अनुत्सुकता दर्शवली होती. त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकारी नितेश पाटोळे यांनी फिर्यादी म्हणून पुढाकार घेत पोलिसांत तक्रार नोंदवली.या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.