सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 क्राईम

मुरगूड सामूहिक अत्याचार प्रकरण; न्यायालय परिसरात आरोपींची मस्ती, पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

डिजीटल पुणे    11-06-2026 17:40:10

कोल्हापूर : मुरगूड येथील महाविद्यालयीन तरुणीवर तब्बल दहा महिने धमकावून सामूहिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा न्यायालय परिसरात दिसून आलेला मस्तवालपणा संतापजनक ठरला आहे. न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना एका आरोपीने पोलीस वाहनात बसून माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर मिश्या पिळत खुन्नस देण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकवत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पुढे या प्रकरणात आणखी तिघांनी प्रवेश करत वेगवेगळ्या ठिकाणी आणि लॉजवर पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात आदित्य बाजीराव शेटके (वय 24), रणजित संभाजी मुधोळकर (वय 29), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय 24) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय 22) या चौघांना मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपी हे राधानगरी तालुक्यातील विविध गावांतील रहिवासी आहेत.

तक्रारीनुसार, आरोपींनी पीडितेला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. तसेच प्रकरण मिटवून टाकण्यासाठी पैशांची मागणीही करण्यात आली होती. भीतीपोटी पीडितेने काही आरोपींना रक्कम दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, एका आरोपीने लग्नाची अट घालत छळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मुरगूड, गिरगाव, कात्यायनी तसेच कोल्हापूर शहर परिसरातील विविध ठिकाणी आणि लॉजवर हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने मुरगूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी चौघांना अटक केली.

मात्र, गंभीर गुन्ह्यातील आरोपी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पोलिसांसमोरच मस्ती करताना दिसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत चिंता वाढत असताना आरोपींमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मुरगूड पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती