पुणे : नीट पेपरफुटी प्रकरण आणि सीबीएसई परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पुण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांच्यासह समाजसेवक सोनम वांगचूक यांनी सहभाग नोंदविला. तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांनीही आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शविली.
विशेष म्हणजे, या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर युवकांचा सहभाग दिसून आला. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून परीक्षाव्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी केली.नीट परीक्षा पेपरफुटी तसेच सीबीएसई परीक्षेतील कथित गोंधळाची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्वीकारावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी यापूर्वीही दिल्ली येथे अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. आगामी २० जून रोजी नवी दिल्ली येथे पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.