सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा पेपर; 21 जूनच्या परीक्षेसाठी 'NTA'कडून वाढवला वेळ, रफ कामाची पानेही वाढवली
 जिल्हा

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांची नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

डिजीटल पुणे    12-06-2026 11:04:47

मुंबई : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) केंद्रीय अतिरिक्त सचिव व व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक (भाप्रसे.) यांची कर्तव्य भवनमध्ये भेट घेतली. २०२६-२७ च्या कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्यांतर्गत (पीआयपी) निधी मंजुरी तसेच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्त्वाची ठरली.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी बालकांची वयोमर्यादा दोन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढविण्यास या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील अधिकाधिक मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आशा स्वयंसेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या दैनंदिन कामकाजातील विविध ऑनलाइन नोंदी, अहवाल सादरीकरण व आरोग्यविषयक माहितीचे डिजिटल व्यवस्थापन  करण्यासाठी आशा स्वयंसेविकांना मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आशा स्वयंसेविकांचे  प्रोत्साहनपर मानधन वेळेत वितरित करण्यासाठीही केंद्र शासनाकडून निधी वेळेवर मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन कार्यक्रम, क्षयरोग निर्मूलनासाठी निक्षय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण वेळेत मिळण्यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची; तसेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सादर केलेल्या नावीन्यपूर्ण आरोग्यविषयक प्रस्तावांना मंजूरी देण्याची  मागणी करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी अनुदान वेळेवर उपलब्ध करून देणे, तसेच पायाभूत सुविधा कक्ष अंतर्गत प्रलंबित देयके तातडीने मंजूर करण्याबाबत यावेळी आग्रह धरण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्रातील निदान सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर विचारविनिमय झाला . तसेच पीएम – एभीम अंतर्गत क्रिटिकल केअर व एकात्मिक सार्वजनिक प्रयोगशाळा साठीचा प्रस्ताव सादर करणेबाबत चर्चा झाली.

महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून लोकाभिमुख योजना राबवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामध्ये समन्वय वाढवण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक असून, आवश्यक ते  सहकार्य मिळेल असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.  बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियान; तसेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती