पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पूल परिसरात गुरुवारी (१२ जून) सकाळच्या सुमारास एका कुरिअर वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टेम्पोचे किरकोळ नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या टेम्पोच्या मागील भागातून धूर येण्यास सुरुवात झाली. प्रसंगावधान राखत चालकाने वाहन तत्काळ रस्त्याच्या कडेला उभे केले. काही क्षणांतच टेम्पोने पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण, सिंहगड वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.