उरण : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड, नवी मुंबई तर्फे उरण चारफाटा येथे रविवार १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महागाई विरोधी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाला जनतेने मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारताचा कम्युनिस्ट पक्षा तर्फे करण्यात आले आहे.
भारताचा कम्युनिस्ट पक्षाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की देशात बारा वर्षांपासून भाजपा आणि पंतप्रधान मोदींची सत्ता आहे. या सत्ता काळात वाढत्या महागाई, बेरोजगारीने सर्व जनता हैराण झाली आहे. पेपर फुटीने दरवर्षी विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. सर्वसामान्य कामगार, कष्टकरी, मागास आणि आदिवासी यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारी धोरणे राबविणे सुरु आहे. २०१४ ला जनतेला बहुत हुई महंगाई की मार चा नारा देत भ्रष्ट काँग्रेस पासून सुटका करीत अच्छे दिन आणण्याचा वादा केला होता.
प्रत्यक्षात मात्र या बारा वर्षात गॅस सिलेंडर ४५० वरुन ९५० रुपयांवर म्हणजे दुपटीने वाढला आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेच्या महागाईत थेट वाढ करणाऱ्या पेट्रोल डिझेलने शंभरी पार केली आहे. त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य व दररोजच्या जगण्यासाठी वापरायच्या चीज वस्तूंच्या किंमतीही दुपटीने वाढल्या आहेत. या वाढत्या महागाईत आता २८ फेब्रुवारीपासून इस्त्राइल, अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या परिणामी या महागाईत सातत्याने वाढ होत आहे. जनतेने निवडून दिलेले सरकार मात्र थातूर मातूर कारणे पुढे करीत या असहाय महागाईचे सत्ताधारी बेशरम समर्थन करीत आहेत. अल्प वेतन आणि पगार असलेल्या सर्वसामान्य जनतेला सकाळी उठल्यानंतर घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांची किती वाढ होईल याची धास्ती लागून राहत आहे. अशा अस्थिर वातावरणात जनता आपलं जीवन जगत आहे. त्याचवेळी मात्र सत्ताधारी महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोनं खरेदी न करण्याचे, तेलाचा वापर कमी करण्याचे हास्यास्पद आवाहन करीत आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केल्याचा आणि खुद्द मुख्यमंत्री मोटार सायकलवरून प्रवास करीत असल्याचे फसवे दिखावे करीत आहेत.
तर दुसरीकडे विकासाच्या नावाने बडया भांडवलदारांच्या (अदानी, अंबानीच्या हितासाठी) शेतकऱ्यांना शेतीवरून हुसकावून लावून उपजिविकेचे साधनच काढून घेवून शेतकऱ्यांना भूमिहीन केले जात आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवरील स्थानिक भूमीपुत्र नष्ट करण्याचा डाव आखला जात आहे. युद्धाचे निमित्त करुन सरकार जनतेला घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करीत आहे. क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाल्याने तेल कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगत आहे.मात्र युद्धापूर्वी ज्यावेळी याच क्रूड ऑईलचे दर कमी होते. त्यावेळी मात्र जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी का केले नाहीत. असा सवाल सर्वसामान्य जनता सरकारला विचारत आहे. परंतु याचे उत्तर मात्र सरकारकडे नाही. वाढत्या महगाई विरोधात प्रश्न विचारणे किंवा विरोध करणे हा भारतीय लोकशाहीत देशद्रोह ठरविला जात आहे. इराण युद्ध सुरु झाल्यानंतर सरकारने देशात इंधनाचा मुबलक साठा असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र तेल साठा कमी झाल्याने अनेक जिल्हयातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या डिझेलसाठी तासनतास उभे राहत अन्न पाण्याविना उपाशीपोटी रांगा लावाव्या लागल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी मारामारीच्याही घटना घडल्या. तर दुसरीकडे शहर आणि गावागावात आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना या गॅस, डिझेल टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेसा गॅस, रॉकेल किंवा डिझेल मिळत नसल्याने अनेक छोटे व्यवसाय बंद पडून कुटुंबावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.
महिलांना धुराचा त्रास होत असल्याने आदवासी व कमी उत्पन्न असलेल्या कुटूंबाना सरकारने उज्वला गॅस योजना आणली होती. यामागे चुली बंद करून महिलांना होणारा चुलीच्या धुराचा त्रास कमी करण्याची कल्पना मांडण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र घरगुती गॅस टंचाईची झळ ही सर्वसामान्य कुटूंबासोबतच मध्यमवर्गीय कुटूंबानाही बसली असून अनेक घरात लाकूड फाटा गोळा करुन चुलीवर अन्न शिजविण्याची वेळ आली आहे. यातून या सरकारचे धोरण आणि घोषणा किती फसव्या आहेत हे स्पष्ट होत आहे. या फसव्या आणि सर्वसामान्य, मध्यमवर्गीय जनतेच्या जगण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आयोजित महागाई विरोधी मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा ! उठा जन हो, जागे व्हा! मोठया संख्येने सहभागी व्हा.असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉ. रामचंद्र म्हात्रे यांनी जनतेला केले आहे.या निषेध मोर्चात सी.आय.टी.यू.,अखिल भारतीय किसान सभा,अखिल भारतीय जनवादी महिला संघटना,डी.वाय.एफ.आय या संघटना सहभागी होणार आहेत.