पिंपरी-चिंचवड : चेन स्नॅचिंगच्या मालिकेमुळे त्रस्त झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले आहे. 'क्राइम पेट्रोल' या लोकप्रिय मालिकेतील काही भाग पाहून पोलिसांपासून बचाव करण्याचे तंत्र आत्मसात केल्याचा दावा करणाऱ्या सराईत चेन स्नॅचरला पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये सापळा रचून अटक केली. सुमित इंगले (रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 76 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ताज्या घटनेनंतर तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेच्या युनिट-1 कडे सोपविण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणांवरील तब्बल 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून आरोपी प्रत्येक गुन्ह्यानंतर बाणेरच्या दिशेने पसार होत असल्याचे स्पष्ट झाले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाणेर-पुणे महामार्ग परिसरात सलग काही दिवस गुप्त पाळत ठेवली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेशांतर करून परिसरात सापळा रचला होता. संशयित आरोपी एका बंद रस्त्याकडे वळताच पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालत त्याला ताब्यात घेतले. या धाडसी कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पोलिस तपासात सुमित इंगले हा जुना गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. 2016 ते 2024 या कालावधीत त्याच्याविरोधात पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आठ गुन्ह्यांची नोंद आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जुगाराच्या व्यसनामुळे तो कर्जाच्या विळख्यात अडकला आणि पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचे तपासात निष्पन्न झाले.
चौकशीदरम्यान आरोपीने 'क्राइम पेट्रोल' मालिकेतील काही भाग पाहून पोलिसांच्या हालचालींपासून कसे बचाव करता येईल आणि चेन स्नॅचिंग अधिक नियोजनबद्ध पद्धतीने कशी करता येईल, याबाबत कल्पना घेतल्याची कबुली दिली आहे.
सुमित इंगले हा एकट्याने दुचाकीवरून चोऱ्या करत होता. गुन्हे करताना तो दोन वाहनांचा वापर करत असल्याचेही तपासात उघड झाले. यापैकी एक दुचाकी त्याची स्वतःची होती, तर दुसरी तो भाड्याने घेत असे. या अटकेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चेन स्नॅचिंगच्या किमान पाच गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी या कारवाईची माहिती देताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचा गौरव करण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.